बेळगाव : बेळगावच्या आंबा खवय्यांना जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि बागायत खात्यातर्फे आजपासून आंबा महोत्सवाची पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली असून या महोत्सवात आंब्यासोबतच मनुकांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे.
शुक्रवार दि. १० मे पासून सोमवार १३ पर्यंत क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा आंबा महोत्सवाबरोबरच मनुकांचे प्रदर्शन आणि विक्रीही होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्याहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना फलोत्पादन विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोड म्हणाले की, बेळगावात ३ दिवसीय आंबा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी आंबा मेळाव्याचा विशेष भाग म्हणजे स्थानिक आंबा उत्पादकांना संधी देण्यात आली आहे. बेळगावमधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून याठिकाणी केमिकलमुक्त आणि चांगल्या दर्जाचे आंबे विकले जात असून ग्राहकांना कमी किमतीत उपलब्ध होतील. अशा महोत्सवाचा शेतकरी व ग्राहक दोघांनाही फायदा होणार आहे. तसेच सुक्या द्राक्ष मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या आंबा महोत्सवात स्थानिक पातळीवर घेण्यात आलेले आंब्याचे उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. फलोत्पादन विभागाच्या सहकार्याने आंबा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून कमीतकमी ५०० रुपये प्रतिडझन या दराने आंबा विणेकरी केला जात असल्याची माहिती बेळगावच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली. हा महोत्सव रविवारपर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत चालणार आहे. आंबा महोत्सवात आलेल्या ग्राहकाने आंबा महोत्सवाचे कौतुक केले. स्थानिक आंब्यासह रत्नागिरी, मालवण येथील विविध प्रजातींच्या आंब्याची पर्वणी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्राहकांनी आभार मानले.
यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, सरकारचे कार्यदर्शी शर्मा इक्बाल, प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर आदी उपस्थित होते.