Sunday , July 26 2026
Breaking News

हजगोळी (चाळोबा टेकडी) परिसरात पर्यटकांना बंदी

Spread the love

 

ग्रामसभेचा निर्णय; वाढते गैरप्रकार, अस्वच्छता आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर कठोर पाऊल

बेळगाव : बेळगाव शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हजगोळी येथील निसर्गरम्य चाळोबा टेकडी परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पर्यटकांची वाढती गर्दी, त्यातून होणारे गैरप्रकार, ग्रामस्थांना होणारा त्रास तसेच वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेऊन ग्रामसभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

चाळोबा देवालय परिसरात बेळगाव शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली होती. विशेषतः मंगळवार व रविवारी सकाळपासूनच येथे मोठी गर्दी होत होती. मात्र, काही पर्यटकांकडून मद्यपान करून दंगामस्ती करणे, महिलांची छेडछाड, अस्वच्छता पसरविणे, प्लास्टिक कचरा टाकणे, मद्याच्या बाटल्या फोडणे तसेच वाद-विवाद आणि मारामारीचे प्रकार वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

याशिवाय, टेकडीलगतच्या धरण परिसरात जलक्रीडा, फोटोशूट आणि धोकादायक स्टंट करण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. नुकतेच गणेशपूर येथील ओमकार नामदेव पाटील (वय २२) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली होती.

या पार्श्वभूमीवर ग्रामसभेने चाळोबा देवालय परिसरात पर्यटकांनी येऊ नये तसेच कोणत्याही प्रकारच्या पार्ट्या आयोजित करू नयेत, असा आदेश जारी केला आहे.

चुलबंदीचा निर्णय

दरम्यान, चाळोबा देवालय परिसरात शंभर टक्के चुलबंदी धोरण लागू करण्यात आले आहे. नवस फेडण्यासाठी देवस्थान परिसरात बकरी अथवा कोंबडी कापण्यासही बंदी घालण्यात आली असून, भाविकांनी आपले नवस आणि धार्मिक कार्यक्रम घरच्या घरीच पार पाडावेत, असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

पर्यावरण संरक्षण, ग्रामस्थांची सुरक्षितता आणि परिसरातील शांतता अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *