बेळगाव : अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाची बैठक आज सोमवारी दुपारी पार पडली. बैठकीत पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत चर्चा करण्यात आली.
कॅम्प येथील भाई दाजिबा देसाई सभागृहामध्ये आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हा चिटणीस व माजी जिल्हा क्रीडा अधिकारी विलास नारायणराव घाडी (येळ्ळूर) हे होते.
शे. का. पक्षाचा 73 वा वर्धापन दिन येत्या 3 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाने वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आल्यानंतर पक्षाचे मध्यवर्ती चिटणीस मंडळाचे ज्येष्ठ सदस्य ॲड. राजाभाऊ पाटील यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. गेल्या सात महिन्यांपासून अखिल भारतीय पातळीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप त्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल बैठकीत निषेध नोंदविण्यात आला.
यंदाचे वर्ष कारगिल विजय दिवसाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे बैठकीच्या प्रारंभी कारगिल युद्धातील शहीद जवानांसह कोरोनामुळे निधन पावलेल्या शेतकरी व कामगारांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत पक्षाचे संपर्क अधिकारी एस. एल. चौगुले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख एल. आय. पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळाराम पाटील, बी. डी. मोहनगेकर व कृष्णा हुंदरे यांनीही मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. बैठकीस शेकाप पक्षाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.