बेळगाव : गेली तेवीस वर्षांहून अधिक काळ शहापूर स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी अखंडितपणे कार्य करणाऱ्या मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुतू मोहीम सुरू करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेच्या आरोग्य सेतू वाहनाचे काल सोमवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले.
शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीच्या विकास आणि सुधारणे बरोबरच मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक व अन्य समाज उपयोगी उपक्रमही राबविले आहेत. गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीच्या काळात मंडळाच्यावतीने शहापूर स्मशानभूमीत जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आणि वेळेवर अंत्यसंस्कार पार पडावेत यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.
दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांना आरोग्य आणि वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. याकडे लक्ष देऊन मुक्तीधाम मंडळाच्यावतीने पुढील काळात जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध सेवाभावी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शहापूर,वडगाव, जुने बेळगाव, भारत नगर, खासबाग या उपनगर परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मंडळाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. मंडळाच्यावतीने यापूर्वी बेळगाव उपनगराबरोबर खानापुरातील दुर्गम भागातही विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
आरोग्य सेतू मोहिमेअंतर्गत पुढील काळात मंडळाच्यावतीने आरोग्य आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सेवेच्या आरोग्यसेतु वाहनाचा वाहनासाठी काही मोजक्या दानी व्यक्ती आणी संघटनांनी आर्थिक मदत दिली आहे. श्रीराम कॉलनी नागरिक संघटनेचे पदाधिकारी गोपाळ मिरजकर, श्री जोशी तसेच भारतनगर येथील साडी कारखानदार विल्सन (बाळू) वेगस यांच्या हस्ते आरोग्य सेतू वाहनाचे पूजन करण्यात आले. यावेळी कोरोना योद्धा माधुरी जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते फेसबूक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मुक्तीधाम मंडळाच्यावतीने सलग 23 वर्षे हाती घेण्यात आलेल्या विविध स्तुत्य सामाजिक उपक्रमांत बाबत कौतुक व्यक्त केले. त्याचबरोबर पुढील काळातही सहकार्याचे आश्वासन दिले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष आणि पत्रकार श्रीकांत काकतीकर यांनी मंडळाच्या कार्याची आणि पुढील उपक्रमांची यावेळी माहिती दिली. मंडळाचे माजी अध्यक्ष विजय सावंत, प्रकाश जरतारकर, राजू माळवदे, ईश्वर जोरापुरे, हरीश दिवटे, हिरालाल चव्हाण व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. आगामी काळात मंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या आरोग्य सेतू उपक्रमाला आर्थिक तसेच विविध प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे. ज्यांना आरोग्यसेतू उपक्रमासाठी मदत द्यावयाची असेल त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहेत.