सौंदत्ती : जत्रेचा प्रसाद खाल्ल्याने एकाच गावातील 46 जणांची प्रकृती बिघडली असून त्यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना तालुक्यातील हुलीकट्टी गावात घडली असून भिरेश्वर येथील जत्रेत आंब्याचा तसेच घरी बनविलेला प्रसादाचे सेवन केल्यामुळे बुधवारी त्यातील 46 जणांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तात्काळ सौंदत्ती सार्वजनिक रुग्णालयात तसेच बेळगाव जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सदर घटनेची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच आरोग्य अधिकारी हुलीकट्टी गावात तळ ठोकून आहेत. गावकऱ्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तालुक्याच्या डॉक्टरांकडून शिबिर सुरू करून गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश कोणे यांनी याबाबत माहिती दिली की, आतापर्यंत कोणतेही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. प्रसादाचे सेवन करणाऱ्यांमध्ये उलट्या तसेच जुलाबाचा त्रास दिसून आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. दर तासाला रुग्णांची तपासणी केली जात आहे. कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदारांनी सौंदत्ती सार्वजनिक रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच रुग्णांना 24 तास वैद्यकीय सोय पुरविली पाहिजे. रुग्णांची आवश्यक ती औषधे तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी डॉक्टरांना यावेळी दिल्या. संख्या वाढू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगितले.