बेळगाव : अनगोळ येथील काळा तलावाच्या विकासासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही हा तलाव समस्यांच्या गर्तेत सापडला आहे.
अनगोळ येथील काळा तलावाच्या विकासासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही हा तलाव समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. तलावाच्या विकासासाठी कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. या अंतर्गत हे काम सुरू करण्यात आले. मात्र, स्वच्छ करण्यात आलेला तलाव पुन्हा केंदाळाने व्यापला आहे. त्यामुळे तलावाच्या सुशोभिकरणासाठी खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेला आहे.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कणबर्गी येथील तलावाच्या विकासकामाला प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, अनगोळ येथील काळा तलावाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. यामुळे तलावाचे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा होत आहे. या तलावामध्ये सांडपाणी सोडण्यात आल्यामुळे दुर्गंधी व कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संपूर्ण तलावातील पाणी दूषित बनले आहे. अशातच विषारी वेली आणि केंदाळ पुन्हा वाढले आहे. तलावातील केंदाळ काढून स्वच्छ करण्यात आले होते. पण या तलावामध्ये गटारीचे सांडपाणी सोडण्यात आल्याने तलाव पुन्हा दुर्गंधीयुक्त बनला आहे. तलावातील सांडपाण्यामुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. वाढलेल्या वेलींमुळे साप-किड्यांची समस्या भेडसावत आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे शेतकरी आणि परिसरातील रहिवाशांमध्ये सापांची भीती निर्माण झाली आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. विषारी वेली आणि केंदाळामुळे तलावातील पाणी दूषित बनले आहे. शहरातील अन्य तलावांचा विकास तातडीने होत आहे. पण या तलावाचे काम रखडत असल्याने या मागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या तलावाचा विकास करण्यास मनपाचे अभियंते उदासीन असल्यामुळे तलावाचे काम रखडल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे या तलावाचा विकास विनाविलंब करण्यात यावा. या ठिकाणी सोडण्यात आलेले गटारीचे पाणी बंद करण्यात यावे व तलाव स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.