बेळगाव : होनगाजवळील मार्कंडेय नदी परिसरात विविध देवी देवतांचे फोटो, निर्माल्य, वैद्यकीय कचरा, प्लास्टिक बाटल्या तसेच इतर कचरा व जादूटोणा करण्यासाठी वापरण्यात येणारे नारळ, लिंबू आदी वस्तू नदीपात्रात टाकल्यामुळे नदीपात्राला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे जवळच असलेल्या वाहन सर्व्हिसिंग सेंटरचे साबणमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नदीचे पाणी दूषित बनत आहे. या कचऱ्यामुळे नदीचे पाणी अशुद्ध बनत चालले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी नदीपात्राची स्वच्छता करून घेणे गरजेचे आहे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.