जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचा आदेश
बेळगाव : बेळगाव शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची धास्ती घेत खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या सर्व शाळांना सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बजावला आहे.
उद्या मंगळवार 11 जानेवारीपासून 18 जानेवारी पर्यंत बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या सर्व शाळाना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बजावला आहे. बेळगावात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी कोविड निवारण आपत्ती निवारण समितीच्या सल्ल्यानुसार हिरेमठ यांनी सदर आदेश जाहीर केला आहे. बेळगाव शहरातील कॅम्प भागातील आणि एका उपनगरातील शाळेतील मुलांना कोरोनाची लागण झाली होती याशिवाय कित्तुर येथील सैनिक शाळेतील 80 जणांना कोविडची बाधा झाल्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
कित्तूर निवासी सैनिक शाळेत कोरोनाचा उद्रेक : 80 विद्यार्थी बाधित
दरम्यान कित्तूर येथील कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक शाळेमध्ये कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून शाळेच्या 10 कर्मचार्यांसह तब्बल 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कित्तूर येथील कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक शाळेतील कांही विद्यार्थ्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला यांची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता प्रारंभी 12 विद्यार्थिनींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असता 68 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. याव्यतिरिक्त इतरही कांही विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे समजते.
कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक शाळेतील 15 ते 18 वर्षे वयोगटातील 12 अधिक 68 अशा एकूण 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या रॅपिड एंटीजन टेस्टमध्ये 12 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर आज सोमवारी आणखी 68 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
एकंदर 700 हून अधिक विद्यार्थी असलेल्या या निवासी शाळेत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मात्र इतक्या प्रमाणात कोरोना बाधित विद्यार्थी आढळून आले असताना देखील सदर शाळा आणि वसतिगृह सील करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह इतर राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी वास्तव्यास आहेत.