बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परिक्षेत बेळगाव शहरात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कारांतर्गत शिष्यवृत्ती देऊन रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात विशेष सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ शिक्षण अधिकारी आय. डी. हिरेमठ व बेळगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष व्ही. एन. जोशी उपस्थित होते.
प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. मुख्य अतिथींच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. डॉ. जे. जी. नाईक यांनी परिषदेच्या कार्याची विस्तृत माहिती दिली. स्वाती घोडेकर यांनी अतिथींची ओळख करून दिली. एन्. बी. देशपांडे व आर. व्ही. गुडी यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांची नावे घोषित केली.
मराठी माध्यमात शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रेरणा प्रकाश पाटील (मराठी विद्यानिकेतन), इंग्रजी माध्यमात तनिषा शंकर नावगेकर (सेंट मेरी हायस्कूल) व कन्नड माध्यमात संपदा विवेक सुतार (गोमटेश हायस्कूल), त्याचप्रमाणे बारावीच्या परीक्षेत विज्ञान विभागात सर्वप्रथम आलेल्या ओम संदीप कुलकर्णी (जी. एस्. एस्. कॉलेज), वाणिज्य विभागात रोहिणी युवराजसिंग राजपूत (गोगटे कॉलेज) व कला विभागात पारुल अनिरुद्ध हुन्नरगीकर (लिंगराज कॉलेज) यांना रोख रक्कम, खास प्रशस्तीपत्र आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी श्री. हिरेमठ यांचा अध्यक्ष विनायक मोरे यांनी शाल, पुष्गुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी भारत विकास परिषद सदस्यांच्या प्रतिभावंत पाल्यांनाही खास पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
प्रतिभा हल्लप्पणवर यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले. व्ही. आर. गुडी व एन्. बी. देशपांडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. कार्यक्रमास डी. वाय. पाटील, सुभाष मिराशी, रामचंद्र तिगडी, कुमार पाटील, गणपती भुजगुरव, पी.एम्. पाटील, उषा देशपांडे, शुभांगी मिराशी, प्रिया पाटील, ज्योती प्रभू, शालिनी नायक आदि उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.