बेळगाव : राज्य सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा निषेध करत बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी चक्क दुचाकीच्या दावणीला बैल बांधून निषेध नोंदविला.
राणी कित्तूर चन्नम्मा येथे भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे आमदार अभय पाटील व माजी आमदार महादेवप्पा यादवाड, अनिल बेनके, महांतेश दोड्डगौडर, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी आदी नेत्यांनी दुचाकीला बैलाची जोड देत अभिनव पद्धतीने राज्य सरकारचा निषेध केला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, काँग्रेस पक्ष हतबल आहे. सरकार बेजबाबदारपणे चालवत आहे, काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून दरवाढ करत आहे, नरेंद्र मोदींनी नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी केले होते, बोम्मई सरकारमध्ये ते 7 रुपयांनी कमी केले होते. पण केंद्र सरकारने सेसचे दर कमी केले नसल्याचा खोटा आरोप काँग्रेसकडून केला जात असल्याचे कडाडी म्हणाले. शासनाने राज्यातील जनतेला हमीभाव योजना दिल्या आहेत. मात्र यासाठी लागणाऱ्या पैशाचे नियोजन नसल्याने जनतेकडून अशापद्धतीने पैसे वसूल करण्यात येत आहेत. काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणाचा हा आरसा आहे. वीज दर, गुंतवणूक दर, व्यावसायिक इमारतींचे दर, भाजीपाला, दूध यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
या आंदोलनात राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, गमाजी आमदार संजय पाटील, माजी आमदार महादेवप्पा यादवाड, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हा भाजप अध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार अनिल बेनके, लीना टोपण्णावर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.