बेळगाव (वार्ता) : विविध कारणांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह सक्तीचा केल्याने बेळगावातील बिम्स इस्पितळ आवारातील कोविड चाचणी केंद्रात नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र एकच केंद्र असल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात जाण्यासाठी व तेथून कर्नाटकात येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. त्याशिवाय कोरोनाची सौम्य लक्षणे जरी दिसली तरी ही चाचणी करून घेण्याचे आवाहन सरकारनेही केले आहे. त्यामुळे बिम्स आवारातील आरटीपीसीआर चाचणी केंद्रात चाचणी करवून घेण्यासाठी नागरिकांची रोज मोठी गर्दी होत आहे. मात्र येथे एकच चाचणी केंद्र असून, तेथे सर्वच वयोगटातील नागरिकांची चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे खास करून ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रार चाचणीसाठी आलेल्या एका महिलेने केली. आरोग्य विभागाचे कर्मचारीही येथे चाचणीसाठी आले आहेत. आता त्यांची चाचणी करणार की आमची समजेना झाले आहे. एकच केंद्र व गर्दीमुळे चाचणी करायला वेळ लागत असल्याने अनेक तास रांगेत तिष्ठत थांबण्याची वेळ आली आहे असा त्रागा या महिलेने व्यक्त केला.
दरम्यान, मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या अनुराग यादव या युवकाने सांगितले की, मी मूळचा कोल्हापूरचा असून बेळगावात केएलई संस्थेत शिकतो. आम्हाला कॉलेजमध्ये आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा केला आहे. त्यामुळे चाचणी करवून घेण्यासाठी थांबलो आहे. पण अजून नंबर आलेला नाही. एकाच काउंटरमुळे सर्वानाच तिष्ठत थांबावे लागत आहे. येथे किमान 2 काउंटर सुरु करण्याची गरज आहे, असे सांगितले.
Check Also
राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा मुलींचा संघ रवाना
Spread the love बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुलींचा फुटबॉल संघ …
Belgaum Varta Belgaum Varta