Monday , December 23 2024
Breaking News

येळ्ळूर – वडगाव रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात पालकमंत्र्यांना येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने निवेदन सादर

Spread the love

 

 

बेळगाव : येळ्ळूर ते वडगावपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण लवकरात लवकर करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतच्यावतीने उपाध्यक्ष आणि सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांना सादर करण्यात आले. गेल्या सुमारे 10 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या येळ्ळूर ते वडगावपर्यंतच्या रस्त्याची अलीकडे पार दुर्दशा झाली आहे. सध्याच्या पावसाच्या मोसमात वाताहत झालेल्या या रस्त्यावरून ये-जा करताना लोकांना मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सदर रस्ता हा सुळगे येळ्ळूर राजहंसगड नंदीहळी देसुर खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी वगैरे गावांना जोडणारा असल्यामुळे या रस्त्यावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची सततची रहदारी असते.

वाळू विटांची वाहतूक करणारे ट्रक आणि डंपर सारखी अवजड वाहने देखील या रस्त्यावर कायम ये -जा करत असतात. परिणामी या रस्त्याची सध्या खचून व खड्डे पडून पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी दररोज एखाद दुसरा अपघात घडणे अथवा वाहने नादुरुस्त होणे हे नित्याचे झाले आहे. आजपर्यंत सदर रस्त्यावर घडलेल्या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू होण्याबरोबरच बऱ्याच जणांना अपंगत्व आले आहे.

अलीकडच्या काळात वाहनांची संख्या देखील वाढली असल्यामुळे सदर रस्त्याचे रुंदीकरण करावे, जेणेकरून हा रस्ता दुपदरी होईल आणि वाहतुकीची कोंडी न होता वाहने देखील सुरळीत ये -जा करतील. या खेरीज सकाळच्या वेळी वडगाव व येळ्ळूर येथील ज्येष्ठ नागरिक सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी या रस्त्याचा वापर करत असतात. तेंव्हा रस्त्याच्या दुतर्फा पदपथ देखील तयार करण्यात यावा. आमच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सदर रस्त्याच्या नूतनीकरणाचा आदेश द्यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही सादर करण्यात आली आहे.

मंत्र्यांनी निवेदनाचा स्वीकार करून सदर रस्त्याचे विकास काम लवकरात लवकर करून तुमची समस्या दूर करू असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती सतीश पाटील यांनी दिली. याप्रसंगी येळ्ळूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पुंडलिक पाटील, समितीचे नेते रमाकांतदादा कोंडुस्कर ,ग्रामपंचायत सदस्य सतीश बाळकृष्ण पाटील, शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, परशराम परीट, जोतिबा चौगुले, मनीषा घाडी, सोनाली येळ्ळूरकर, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *