बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण ही समाजसेवेसाठी सतत झटणारी संस्था आहे. समाज विकासाच्या कामात रोटरी दर्पणचे योगदान असते. शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसंवर्धन, सामाजिक अशा विविध क्षेत्रात काम करत असून गरजू महिलांना सक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे उद्गार रोटरी क्लबचे प्रांतपाल शरद पै यांनी काढले. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी रोटरी दर्पणच्या अध्यक्षा रुपाली जनाज या होत्या. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे मण्णूर गाव दत्तक घेण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी जनाज यांनी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने महिला तसेच मुलींनाही संगणक प्रशिक्षण, शिलाई मशिन प्रशिक्षण व वाटप, गरजू मुलीना शाळेत जाण्यासाठी सायकल वाटप असे उपक्रम राबवले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रांतपाल शरद पै यांनी दिली. यावेळी उद्योजक आर. एम. चौगुले, ग्रा. पं. अध्यक्ष मुकुंद तरळे, सहाय्यक प्रांतपाल महेश बेल्लद, माजी अध्यक्षा शीतल चिलमी, कावेरी करूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.