म. ए. समिती-शिवसेनेतर्फे बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव (वार्ता) : वादग्रस्त सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करण्याच्या मागणीसाठी 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आज बेळगावात अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. मराठी अस्मितेची ज्योत विझणार नाही असा ठाम निर्धारच या निमित्ताने करण्यात आला. रामदेव गल्लीतील हुतात्मा स्मारकात सोमवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेतर्फे अनसूरकर गल्ली, किर्लोस्कर रोडमार्गे हुतात्मा चौकापर्यंत मौन फेरी काढण्यात आली. त्यानंतर हुतात्मा चौकात सीमाप्रश्नासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या शूर हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सीमाभागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमांसमोर पुष्पहार व पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.
न्याय मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही : दीपक दळवी
यावेळी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, 17 जानेवारी 1956 रोजी मराठीबहुल सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करण्याची आण घेतलेल्या कार्यकर्त्यांनी प्राणांची आहुती देऊन मराठी अस्मितेचा वन्ही चेतविला. त्यांची आण घेऊन मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी गेली 66 वर्ष आपण वेगवेगळ्या मार्गानी हा लढा देत आहोत. त्यात अपेक्षित यश मिळाले नसले तरी, हे असिधाराव्रत आपण सुरु ठेवले आहे. आमच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही लढा देत असताना, सीमेवर नेऊन यांना गोळ्या घाला असे म्हणणार्या सरकारशी लढत आहोत. हा लढा न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही असे ठासून सांगितले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘अमर रहे, अमर रहे, हुतात्मा अमर रहे’, ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
कोरोनाचे नियम पाळून आचरणमास्कचा वापर, सामाजिक अंतर असे कोरोनाचे नियम पाळून स्वयंशिस्तीने हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आचरण करण्यात आले. मुकफेरीला केवळ 5 जणांनीच उपस्थित राहण्याची अट प्रशासनाने घातली होती. त्यानुसार 5 जणांच्याच सहभागाने अनसूरकर गल्लीपासून हुतात्मा चौकापर्यंत मुकफेरी काढण्यात आली.
यावेळी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण-पाटील, नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेवक रवी साळुंखे, वर्षा आजरेकर, रोमा किरण ठाकूर, शिवानी पाटील, रेणू किल्लेकर, बंडू केरवाडकर, राजू तुडयेकर, गणेश दड्डीकर, राजू बोंगाळे, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, सतीश पाटील, पियूष हावळ, उमेश पाटील, यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.