बेळगाव (वार्ता) : सीमाभागातील मराठी भाषिकांचे आधारवड, पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्याने गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन. डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसर्या लाटेत त्यांना लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली.
सीमाभागातील मराठी माणसाबद्दल आस्था ‘एन. डी.’ याच नावाने अधिक लोकप्रिय असणार्या प्रा. एन. डी. पाटील यांना सीमाभागातील मराठी माणसाबद्दल आस्था, कणव होती. सीमावासियांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते सदैव अग्रेसर होते. कित्येकदा प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी बेळगावात प्रत्यक्ष येऊन येथील मराठी माणसाच्या लढ्यात भाग घेतला. कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगत बेळगावात सुवर्णसौध बांधून अधिवेशन घेण्यास प्रारंभ केला. त्याचवर्षीपासून बेळगावात अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळावा घेण्यात येऊ लागला. यामागची संकल्पना आणि ऊर्जा एन. डी. पाटील यांचीच होती. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी लेखणी आणि वाणीसोबतच प्रत्यक्ष सहभाग घेत कर्नाटक आणि केंद्र सरकारला मराठी माणसावरील अन्यायाचा जाब विचारला. आज सीमाभागात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून हुतात्मा दिन साजरा करण्यात येत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली हाही एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.
Check Also
सन्मित्रच्या खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : येळ्ळूर येथील सन्मित्र फौंडेशन आयोजित जिल्हास्तरीय मुलामुलींच्या खो-खो स्पर्धा रविवार …