बेळगाव : नौगोबा यात्रेच्या (रेणुका देवी यात्रा) जागेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी भाजपा राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी ब्रिगेडीयर जोयदीप मुखर्जी यांची शुक्रवार दि. 16 रोजी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी अनिल बेनके म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून येथे नौगोबा यात्रेच्या (रेणुका देवी गदगा) जत्रा उत्सवासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्य आणि केंद्र स्तरावर सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर पावले उचलल्यानंतर आम्हाला आमचे नौगोबा यात्रेचे ठिकाण मिळाले आहे. ब्रिगेडीयर मुखर्जी यांनी येत्या सोमवार किंवा मंगळवारी घटनास्थळाला भेट देऊन जत्रा उत्सवाच्या जागेची पाहणी करुन आवश्यक कामासाठी निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच या ठिकाणाच्या सुशोभिकरणासाठी मदत करणार असल्याचे मराठा लाईट इंफ्रंट्री यांनी सांगितले.
शेकडो वर्षांपासून आई यल्लाम्मा (रेणुका देवी) जत्रे दरम्यान के.एस.आर.टी.सी. बस स्थानक येथे पालखी आणि हिंदू धार्मिक परंपरेनुसार जत्रा आयोजित केली जाते. डिफेन्स व राज्य परिवहन संस्थेच्या सहकार्याने आम्हाला आमची जागा मिळाली असून बेळगांववासी आनंदी आहेत. बेळगांवची जनता एकत्र येवून आमची परंपरा व विकासाला हातभार लावेल असे ते म्हणाले.
यावेळी शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, सेक्रेटरी परशराम माळी व विजय तंबुचे आदी उपस्थित होते.