सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर
बेळगाव : श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शहापूर -बेळगाव या सहकारी बँकेने आर्थिक वर्षात 61 लाख 57 हजार 85 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून संस्थेने यंदा सभासदांसाठी 13% लाभांश जाहीर केला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन प्रकाश आप्पाजी मरगाळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
बँकेचे भाग भांडवल एक कोटी 43 लाख 29 हजार 500 रुपये असून राखीव व इतर निधी 9 कोटी 8 हजार 675 रुपयांचा आहे. बँकेत 53 कोटी 77 लाख 72 हजार 123 रुपयांच्या ठेवी असून संस्थेने 36 कोटी 26 लाख 68 हजार 805 रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. 27 कोटी 60 लाख 38 हजार 172 रुपयांची गुंतवणूक असून 68 कोटी 14 लाख 13 हजार 755 रुपयांचे खेळते भांडवल आहे, अशी माहिती बँकेचे संचालक प्रदीप शंकर ओऊळकर यांनी पत्रकारांसमोर संस्थेचा अहवाल वाचन करताना दिली.
बँक कर्मचाऱ्यांकडून सभासद आणि ग्राहकांना मिळणारी उत्तम सेवा तसेच सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि ग्राहकांचा बँकेवरील विश्वास यामुळे बँकेची उल्लेखनीय प्रगती साधली आहे. यापुढेही बँकेकडून सभासदांना उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी यावेळी बोलताना दिली.
तुकाराम सहकारी बँक अमृत महोत्सवी वर्षाकडे यशस्वीरित्या वाटचाल करीत असून ग्राहक आणि सभासदांच्या विश्वासार्हतेस बँक पात्र ठरल्याची ही पोचपावतीच असल्याचे प्रकाश मरगाळे म्हणाले.
याप्रसंगी मोहनराव कंग्राळकर, नारायण कृष्णाजी पाटील, अनंत रामचंद्र जांगळे, राजू यशवंत मरवे, प्रवीण जाधव, महादेव सोंगाडी यासह अन्य संचालक उपस्थित होते.