Thursday , September 19 2024
Breaking News

बलिष्ठ आणि सदृढ समाज निर्मितीसाठी अध्यात्माची पाळेमुळे समाजात खोलवर रुजविणे गरजेचे : श्री मंजुनाथ स्वामीजी

Spread the love

 

बेळगाव : सांस्कृतिक वारसा असणाऱ्या बेळगाव नगरीला आध्यत्मिक नगरी बनवू. मात्र, यासाठी आपल्याला बेळगावकरांची साथ हवी, असे बेंगळुर येथील गोसाई मठाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामीजी म्हणाले.
सकल मराठा समाजाच्यावतीने हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात श्रावण मासानिमित्त आयोजित प्रवचन कार्यक्रमात स्वामीजींनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भारतभूमी अध्यात्मामुळे एक वेगळी ओळख घेऊन समस्त विश्वात उभी आहे. आपल्या देशाकडे आध्यत्मिक श्रीमंती आहे, असेही मंजुनाथ स्वामीजी यावेळी बोलताना म्हणाले.

आध्यत्मिक बळावरच राजसत्ता भक्कमपणे उभी राहते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यही याचं आध्यत्मिक आणि नैतिक बळावर उभे होते, असे सांगताना आध्यत्मिकताचं सदृढ आणि बलशाली समाज उभारणीला पूरक ठरते, असेही स्वामीजींनी सांगितले.
चांगले आचार आणि चांगले विचार मनुष्याच्या प्रगतीला कारणीभूत ठरतात. इतरांचं भलं चिंतील की आपसूकच आपलंही भलं होतं, हे ध्यानात ठेवून आपले आचार-विचार शुद्ध ठेवा, असा सल्ला स्वामीजींनी दिला. यावेळी त्यांनी श्रावण मासाचे महत्त्व कथन केले.

आपलं समाजाप्रति काहीतरी देणं लागतं, याचा विचार करून मराठा समाज बांधवांनी एकसंघ राहून समाजोन्नतीसाठी योगदान द्यावे, असेही मंजुनाथ स्वामीजी यावेळी म्हणाले.
यावेळी मराठा समाजाचे नेते आणि विमल फौंडेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण जाधव, ईश्वर लगाडे, वकील सुधीर चव्हाण, राजन जाधव, हभप शंकर बाबली, उद्योजक जयदीप बिर्जे उपस्थित होते.
प्रारंभी वर्षा बिर्जे, श्री मंजुनाथ स्वामीजी, किरण जाधव यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत गोपाळ बिर्जे यांनी स्वामीजींचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींचे पाद्यपूजन करण्यात आले. महादेव चौगुले यांनी प्रास्ताविक केल्यानंतर स्वामीजींच्या प्रवचनाला प्रारंभ झाला.
स्वामीजींनी आपल्या प्रवचनात सद्य सामाजिक परिस्थितीचा उहापोह केला. श्रावण मासाचे पावित्र्य सांगितले. तसेच अध्यात्माचे महत्त्व, अध्यात्माचे आचरण याबद्दल माहिती दिली देऊन बलिष्ठ आणि सदृढ समाज निर्मितीसाठी अध्यात्माची पाळेमुळे समाज आणि मानव मनात खोलवर रुजविणे अत्यावश्यक असल्याचे स्वामीजी प्रवचनात म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *