Thursday , November 21 2024
Breaking News

मुश्रीफांना जागा दाखवणार, समरजीतला मंत्री करणार; शरद पवारांचा कागलकरांना शब्द

Spread the love

 

कोल्हापूर : भाजप नेते समरजित घाटगे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. पक्षप्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील कागलमध्ये गैबी चौकात समरजित घाटगे यांचा भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी समरजित घाटगे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शरद पवारांनी आपल्या भाषणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. तसेच समरजित घाटगे यांची उमेदवारी घोषित केली. यावेळी शरद पवारांनी समरजित घाटगे यांच्याबद्दल मोठी घोषणा केली. “तुम्ही समरजित घाटगे यांना आमदार करा. ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू”, अशी मोठी घोषणा शरद पवारांनी केली.

“जबरदस्त संख्येने तुम्ही समरजित घाटगे यांच्यासाठी उपस्थित राहिलात. मी गैबी चौकात अनेकदा सभा घेतल्या, पण आजची गर्दी मी कधी पाहिली नाही. याचा अर्थ परिवर्तनाचा निर्णय जो समरजित घाटगे यांनी घेतला तो योग्य आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेली साथ विसरून चालणार नाही. मागे एकदा पक्ष फुटला त्यावेळी सदाशिवराव आणि बाबासाहेब यांनी पाच वर्षात पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला. कोल्हापूरची भूमी स्वाभिमान गहाण ठेवत नाही हे या सहकाऱ्यांनी दाखवून दिले होते”, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवारांचा मुश्रीफांवर निशाणा
“आम्ही याच तालुक्यातील काही लोकांना साथ दिली, मोठे केले. पण संकट काळात सोबत राहण्याऐवजी पळून गेले. त्यांचा हिशोब करायचा आहे. कागल तालुक्यानं कधी लाचारी स्वीकारली नाही. ईडीची धाड पडल्यावर त्यांच्याच घरातील महिला म्हणाली होती की, आम्हाला गोळ्या घाला. पण त्याच घरातील प्रामुख्याने लाचारी स्वीकारली”, अशी टीका शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केली. “आता राज्य घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

पवारांची महायुतीवर टीका
“तरुणांची कष्ट करण्याची तयारी आहे पण त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. राज्यात दररोज दोन चार बातम्या या महिला अत्याचाराच्या असतात. बदलापूरमध्ये घटना घडली, आरोपींवर कारवाई करायची सोडून आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्याचं काम केले”, अशी टीका शरद पवारांनी महायुती सरकारवर केली.

About Belgaum Varta

Check Also

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *