खंजर गल्ली – जलगार गल्लीतील खाजगी जमिनीवर रस्ता बांधकामाचे प्रकरण
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या हद्दीत खासगी जमिनीवर बांधलेला रस्ता मोकळा करून मूळ मालकाला परत केल्याची आणखी एक घटना घडली आहे. पंधरा वर्षांपूर्वी बेळगावमधील खंजर गल्ली-जालगार गल्ली येथे मकबूल आगा यांच्या मालकीच्या ८०० चौरस फूट जागेवर रस्ता तयार करण्यात आला होता. रस्ता तयार करूनही मोबदला दिला नाही. याबाबत मकबूल आगा यांनी बेळगावच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने संबंधित जमीन मालकांना जमीन परत करण्याचे आदेश दिल्यानंतर रस्ता मोकळा झाला. महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या अधिकाऱ्यांनी जागा मालकांच्या ताब्यात दिली आहे. महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते व स्थानिक नगरसेवक मुझम्मील डोणी यांनी रस्ता मोकळा केल्यास स्थानिकांना त्रास होईल, असे जमीन मालकांना समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र जमीन मालकांनी ते मान्य केले नाही. रस्ता मोकळा मोहिमेदरम्यान शेकडो लोक जमले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बाजारपेठ पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.