बेळगाव : महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे सर्वत्र मातीचे ढिगारे तसेच कचरा साचला होता. पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचल्याने मैदानात चिखल होत होता. त्यामुळे मैदान सुस्थितीत करून द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी धर्मवीर संभाजी उद्यान येथील कचरा तसेच मातीचे ढिगारे व्यवस्थित करत विद्युत खांबांवरील वीजवाहिन्या तसेच इतर काम करून दिल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या धर्मवीर संभाजी उद्यानात पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. तसेच ठिकठिकाणी कचरा देखील साचला होता. पाण्याचा निचरा होण्यास जागा उपलब्ध नसल्याने चिखल होत होता. काही ठिकाणचे लाईट बंद असल्याने रात्रीच्यावेळी तळीरामांचा धिंगाणा सुरू असायचा. त्यामुळे या मैदानाचा विकास करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी आमदार राजू सेठ यांच्याकडे केली होती.
काशिनाथ हिरेमठ, अमोघ देशपांडे, अतुल रजपूत, प्रकाश नाईक, बाबू पुणेभावी यांनी आमदारांना निवेदन दिले होते. याची दखल घेत शनिवारी जेसीबीच्या साहाय्याने मातीचे ढिगारे दूर करण्यात आले. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आला. त्याचबरोबर परिसरातील वीजवाहिन्यांची दुरुस्तीही करण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.