युवा व्याख्याते युवराज पाटील यांचे व्याख्यान
बेळगाव : येथील संजीवीनी फौंडेशनच्यावतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘उमंग २०२४’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्त मंगळवारी (ता.१) सायंकाळी ४ वाजता लोकमान्य रंग मंदिरात येथे युवा व्याख्याते युवराज पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
संजीवीनी फौंडेशनने साठ वर्षांवरील नागरिकांसाठी गायन आणि नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला असून, त्याची अंतिम फेरी ज्येष्ठ नागरिकदिनी होणार आहे. सुरुवातीला सायंकाळी चार वाजता अंतिम फेरीसाठी पात्र स्पर्धकांचे सादरीकरण होईल.
यानंतर शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिवाजी कागणीकर, आर. एम. पाटील आणि अनिता रोड्रिग्स यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर युवराज पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. युवराज पाटील यांची वेगवेगळ्या विषयांवर साडे आठशे व्याख्याने झाली असून, ते युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला आपल्या व्याख्यानातून खिळवून ठेवतात. मूळचे ते गारगोटी येथील असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते एक प्रेरक वक्ता म्हणून सुपरिचित आहेत.
तरी कार्यक्रमाला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजीवीनी फौंडेशनच्यावतीने सीईओ मदन बामणे व संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी केले आहे.