मराठा समाज सुधारणा मंडळाची सभा संपन्न
बेळगाव : मराठा समाजातील युवकांनी सण, उत्सवामध्ये गुंतून न जाता शिक्षण, नोकरी व उद्योगधंद्याकडे लक्ष द्यावे असे मत मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अनेकांनी व्यक्त केले. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, खजिनदार के. एल. मजूकर, सहचिटणीस संग्राम गोडसे, रघुनाथ बाडगी, सुरेन्द्र जाधव, ईश्वर लगाडे, दत्ता जाधव, राजू पावले, प्रकाश गडकरी उपस्थित होते.
यावेळी समाजातील युवकांना व महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिरे व चर्चासत्राचे तसेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे यासाठी अनेकांनी जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले.
समाजातील वाढती व्यसनाधिनता व मुहूर्तावर न लागणा-या विवाह सोहळ्यावरही अनेकांनी चिंता व्यक्त केली. यंदाची लांबलेली गणेश विसर्जन व मोठ्या गणेश मूर्ती यावरही विचार व्यक्त करून गणेशोत्सव महामंडळ व मराठा समाज सुधारणा मंडळ यांनी संयुक्त प्रयत्न करावेत अशी सूचना मांडण्यात आली.
मंडळाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्याबरोबरच स्मरणिका प्रसिद्ध करणे, समाजातील सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी बजावून समाजाला दिलेले योगदान लक्षात घेऊन अशा व्यक्तीचा सन्मान करणे, शैक्षणिक निधी उभारणे यावरही चर्चा झाली.
प्रारंभी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले तर संग्राम गोडसे यांनी मागील वर्षाचे इतिवृत वाचून त्याला मंजुरी घेतली. सन 2023-24 चा जमाखर्च के. एल. मजूकर यांनी मांडून त्याला मंजुरी घेतली. 2024-25 सालासाठी अनिल मंडोळकर यांची लेखापरीक्षक (सी.ए.) तर सहाय्यक म्हणून सुनिल आनंदाचे यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
यावेळी राजेंद्र मुतगेकर, रणजित हावलाण्णाचे, नेताजी जाधव, सुनील भोसले, अनंत लाड, विलास बेळगावकर, शुभम शेळके, महादेव पाटील यांनी उपयुक्त सुचना केल्या. ईश्वर लगाडे यांनी आभार मानले.
सर्वसाधारण सभेस बहुसंख्य सभासद उपस्थित होते.