२०२४-२०२९ सालाकरिता नव्या कार्यकारिणीची निवड
बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली. या सभेत पत्रकार संघास मिळालेला निधी अन्यत्र वळविल्याने माजी आमदार अनिल बेनके यांचा निषेध करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक होते.
प्रारंभी संघाचे दिवंगत सभासद प्रशांत बर्डे, गुरूनाथ भादवणकर, डी मिडियाचे संचालक दीपक सुतार यांची पत्नी अक्षता सुतार, पत्रकार महादेव पवार यांचे चिरंजीव विघ्नेश पवार, पत्रकार अमृत बिर्जे यांचे वडिल मधुकर बिर्जे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
अध्यक्ष विलास अध्यापक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर कार्यवाह शेखर पाटील यांनी मागील वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचे वाचन, जमा-खर्च, नफा-तोटा पत्रक व अंदाज पत्रक सादर केले. त्यास सर्वानुमते संमती देण्यात आली.
नव्या कार्यकारिणीची निवड
यानंतर २०२४-२०२९ या पाच वर्षाकरिता नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कृष्णा शहापूरकर, सदानंद सामंत, राजेंद्र पोवार, विलास अध्यापक, शेखर पाटील, सुहास हुद्दार, परशराम पालकर, महेश काशीद, जितेंद्र शिंदे, शिवराज पाटील व मनोज कालकुंद्रीकर यांचा नव्या कार्यकारिणीत समावेश आहे. रोहन पाटील यांनी कार्यकारिणी निवडीचा प्रस्ताव मांडला व राजेंद्र मुरकुंबी यांनी अनुमोदन दिले.
यावेळी पत्रकार संघासाठी निधी उभारण्याबाबत उपस्थित सभासदांनी सूचना केल्या.
माजी आमदार फिरोज सेट यांनी पत्रकार संघासाठी आपल्या आमदार निधीतून १० लाख रूपये मंजूर केले होते. पण त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर हा निधी माजी आमदार अनिल बेनके यांच्याकडे वर्ग झाला. मात्र अनिल बेनके यांच्याकडून या निधीचा वापर अन्यत्र केला गेला. त्याबद्दल या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करून त्यांचा निषेध करणारा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
सभेत ऍड. नागेश सातेरी, कृष्णा शहापूरकर, सुनील गावडे, रवींद्र जाधव, डी. के. पाटील, प्रकाश नंदीहळी, आदींनी भाग घेऊन विविध सूचना केल्या.
संघांची आर्थिक स्थिती भक्कम व्हावी यासाठी संघाचे ज्येष्ठ सदस्य मनोहर कालकुंद्रीकर यांनी देणगी देऊन सहकार्य केले.
बैठकीस बहुसंख्य सभासद उपस्थित होते. पत्रकार सुहास हुद्दार यांनी आभार मानले.