बेळगाव : शहरातील कॅन्टोनमेंट बोर्डच्या वतीने गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती व स्वच्छता अभियानाची सांगता समारंभ रेल्वे कम्युनिटी हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी, आमदार राजू सेठ, सदस्य सुधीर तुपेकर, बोर्डाचे सीईओ राजीव कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमात बोर्डाचे माजी सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कॅन्टोनमेंट शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीत व रघुपती राघव राजाराम या भजनाने झाली. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, नाटक असा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर स्वच्छता पखवाड्या अंतर्गत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी, कर्मचारी, शाळेचे पालक यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमामध्ये आमदार राजू सेठ व ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी बोर्डातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा व स्वच्छता अभियान यांचे कौतुक करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी बेस्ट आऊट ऑफ वेस्ट या संकल्पने अंतर्गत टाकाऊ वस्तु पासून अनेक टिकाऊ वस्तू तयार करून शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने प्रदर्शन मांडण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी.ई.ओ. राजीवकुमार यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन एन.बी. गावडे व अंजुम चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक्षक एम.वाय. ताळूकर, अभियंता सतीश मंन्नूरकर, एस. एम.कलाल, सतीश गुरव, डॉ.रवींद्र अनगोळ, प्रियांका पेटकर, बसवराज गुडदोगी, शिवप्रसाद हरकुनी, कार्यालय कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.