बेळगाव : बेळगावातील उपनगर परिसरात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे.याकडे लक्ष देऊन साहेब फाऊंडेशन आणि भारतमाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतनगर, चांभारवाडा व परिसरातील नागरिकांना रोगप्रतिबंधक डोस मोहीम राबविण्यात आली.
साहेब फाऊंडेशनच्या संस्थापिका श्रीमती उज्वला संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे गेल्या वर्षी कोरोना काळात आरोग्य उत्सव उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आरोग्य उत्सव उपक्रमांतर्गत शहापूर, वडगाव, खासबाग, भारतनगर परिसरातील तब्बल ५० हून अधिक सार्वजनिक उत्सव गणेश मंडळांना ऑक्सी मीटर वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गेले नऊ दिवस सांस्कृतिक भवन येथे येणाऱ्या नागरिकांना थर्मल स्किनिंग, ऑक्सिजन चेकिंग, डेंग्यू लस, रक्तदान, ऑक्सीजन सिलेंडर सेवा देण्यात आली होती.
त्यानंतर या वर्षीही कोरोना बरोबरच अलीकडच्या काही दिवसात बेळगाव उपनगर परिसरात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे. याकडे लक्ष देऊन साहेब फाऊंडेशनच्यावतीने रविवारी शहापूर चौक चांभारवाडा, भारत नगर पहिला क्रॉस, नवी गल्ली आदी परिसरातील तब्बल ७०० हून अधिक लोकांनी रोगप्रतिबंधक डोस देण्यात आला. त्यानंतर भारतनगर येथील भारतमाता महिला मंडळाच्या सदस्यांनी भारतनगर आणि आदर्शनगर श्री राम कॉलनी परिसरातील महिला, मुले आणि ज्येष्ठांना रोग प्रतिबंधक डोसचे वितरण केले.
या मोहिमेसाठी मंडळाच्या अध्यक्षा रेणु काकतीकर, वंदना मुचंडी, वैष्णवी काकतीकर, दीपांजली बसरीकट्टी, यमुना महिंद्रकर, अन्नपूर्णा निचळ व अन्य सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.