बेळगाव (रवी पाटील) : गोजगे येथे श्री शिवस्मारक युवा संघटनेच्या वतीने दसऱ्याच्या निमित्ताने व्याख्यान व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते हिरामणी मुचंडीकर यांची उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना “लव जिहाद आणि शिवप्रेरणा” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेत सामाजिक एकता आणि जागरूकतेची महत्त्वपूर्ण शिकवण दिली. विशेषतः लव जिहाद विषयावर त्यांनी तरुणाईला सावध राहण्याचा आणि एकमेकांच्या धर्मांचा आदर राखत समाजात सामंजस्य वाढवण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात बेळगावची रिल ॲक्टर मानसी पाटील (कुद्रेमानी) हिचा नवरात्र निमित्ताने महिलांवरील अत्याचारांवर आधारित सामाजिक संदेश देणाऱ्या रिल्ससाठी विशेष सत्कार करण्यात आला. नवरात्रात दुर्गामातेच्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरण आणि समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याचा संदेश तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे दिला. या कार्याबद्दल तिचा सन्मान ग्रामपंचायत सदस्या रेणूका युवराज प्रभावळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
तसेच, प्रमुख पाहुणे शिवव्याख्याते हिरामणी मुचंडीकर यांचाही संघटनेचे अध्यक्ष कुमार बसवंत पावशे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा कार्यकर्ते युवराज ल. प्रभावळकर, पद्मराज पाटील, जोतीबा पावशे, विश्वजित कांबळे, कल्लाप्पा अष्टेकर, निरंजन अष्टेकर तसेच ग्राम पंचायत उपाध्यक्ष शंकर सुतार, ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील, सुभाष नाईक, सदस्या ललिता पाटील आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संघटनेचे कार्यकर्ते अध्यक्ष कुमार बसवंत पावशे, उपाध्यध्य कलिंदर होनगेकर, निलेश बेळगावकर, योगेश चलवेटकर, किशोर मजूकर, नागेश होनगेकर व राहूल मजूकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन अष्टेकर यांनी उत्तमरीत्या केले.
कार्यक्रमाचा समारोप
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या उपक्रमांचे कौतुक केले आणि भविष्यातही असे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta