बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु असून या आंदोलनाला सरकार म्हणावा तसा प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत पंचमसाली समाजाची आरक्षणाच्या विषयावर बैठक होणार होती, मात्र बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांचे कोणतेच संकेत मिळाले नाहीत. यामुळे १८ ऑक्टोबर रोजी पंचमसाली समाजाच्या वतीने “चलो बेंगळुरू”ची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती कुडलसंगम पिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आरक्षणप्रश्नी आजवर सात टप्प्यात आंदोलन करण्यात आले. मात्र आमच्या लढ्याला शासनाकडून न्याय मिळाला नाही. २२ सप्टेंबर रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वकिलांच्या राज्यस्तरीय परिषदेत १५ सप्टेंबर रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी पंचमसाली समाजासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही बैठकीसंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. पंचमसाली वकिलांचा संघर्ष दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त होत असून त्यामुळे पंचमसाली समाजाचे वकील व कार्यकर्ते १८ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे जाऊन विधानसौधसमोर ठिय्या मांडून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहेत. त्या दिवशीही प्रतिसाद न मिळाल्यास पुढील संघर्षाची रूपरेषा ठरवली जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी आर.के. पाटील, गुंडू पाटील, निंगाप्पा फिरोजी, आर.सी.पाटील, आर.पी. पाटील, राजू मगदूम, मेनसी, प्रकाश भाविकट्टी, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.