बेळगाव : शहापूर येथील सरस्वती वाचनालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम पार पाडले जात आहेत. याच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग उद्या दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता येथील लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना इनामदार म्हणाल्या, अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग सरस्वती वाचनालयाच्या जागेत केला होता. त्याचे औचित साधून वाचनालयाने 150 वर्षानंतर हा प्रयोग पुन्हा करण्याचे ठरविले आहे.
बेळगाव येथील नवोदित कलाकारांनी हे आव्हान घेतले आहे. या संगीत नाटकाचे दिग्दर्शन प्रा. डॉक्टर संध्या देशपांडे व संगीत निर्देशक सुनीता देशपांडे व श्री नंदन हेर्लेकर यांनी केले आहे. या नाटकामध्ये योगेश रामदास, आदिनाथ पाटील, मंजिरी धोपेश्वरकर, निधी केळकर, वैष्णवी सडेकर, तनिष्क जोशी, राजसी गोजगेकर, प्राची कुलकर्णी, दया शिंदे, आरुष कुलकर्णी, सुधीर शेंडे, यश याळगी, चिन्मय शेंडे, ऋषिकेश हेर्लेकर, तन्मय कुरुंदवाड, खूषी लाटुकर, मृणाली लाटूकर, त्रिवेणी लाटूकर, वाणी होनगेकर, रोमा धामणेकर या नव्या दमाच्या कलाकारांचा सहभाग आहे.
नेपथ्य रचना कल्पना कुलकर्णी यांनी तर संवादिनी चैत्रा अध्यापक, ऑर्गन साथ मंगेश मंत्री, तबला आकाश पाटील, प्रकाश योजना गुरुदत्त पेडणेकर, राजू पवार व रंगमंच व्यवस्था प्रवीण प्रभू यांची आहे. मराठी संगीत रंगभूमीवर अजरामर ठरलेल्या या नाटकाचा दुर्मिळ प्रयोग पाहण्याची संधी बेळगावच्या नाट्य रसिकांना लाभली आहे.. याचा लाभ रसिकांनी घ्यावा, देणगी प्रवेशिका सरस्वती वाचनालय, लोकमान्य ग्रंथालय, लोकमान्य रंगमंदिर, किरण एअरकोन, सुहास सांगलीकर यांच्याकडे उपलब्ध आहेत, असेही स्वरूपा इनामदार यांनी स्पष्ट केले. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, डॉक्टर संध्या देशपांडे उपस्थित होते.