
मानकापूरमध्ये साहित्य संमेलन
निपाणी (वार्ता) : माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे. देव दगडात नसून तो भुकेलेल्या, तहानलेल्या, भिकारी, अपंग, आंधळे- पांगळे यांच्या ह्रदयात आहे. त्यांची सेवा केल्यास देव भेटल्या शिवाय राहणार नाही. साहित्य हा समाजाचा आरसा आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करुन समाज सुधारण्याचे काम झाले पाहिजे. यासाठी नवोदित लेखक, कवी आणि पत्रकारांनी समाजात घडणाऱ्या वास्तवाचे लेखन करुन समाजाला दिशा देण्याची आवश्यकता आहे, असे मत गारगोटी येथील साहित्यिक साताप्पा सुतार यांनी व्यक्त केले.
मानकापूर येथे आयोजित पहिल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सुतार बोलत होते.
प्रारंभी ग्रामदैवत श्री मलकारसिध्द चरणी व अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. नंदिनी कदम त्यांनी स्वागत केले. यावेळी कथाकथनकार कृष्णात कोरवी, इचलकरंजी यांनी आपल्या ‘वाटणी’ या कथेचे उत्कृष्टपणे सादरीकरण करून प्रबोधन केले. आप्पासो बंडगर कुरुंदवाड, राजेंद्र कांबळे- टाकवडे, मारुती पोळ- माणकापूर यांनी मनोगत व्यक्त केले. कवी संमेलनाचे अध्यक्ष रंगराव बन्ने (बारवाड), निमंत्रित कवीविजय पवार (टाकवडे), दस्तगीर नदाफ, प्रेमनाथ पवार, शीघ्रकवी- बाळासाहेब मोहिते (इचलकरंजी), शांतिनाथ पाटील, भरत पाटील (कोथळी), सचिन बेलेकर (कोरोची), प्रा. प्रमोदिनी माने व बालकवी सर्वेश पाटील (कोडोली ता. पन्हाळा) यांनी आपल्या कविता सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. माणकापूर येथील अष्टपैलू कलाकार अर्जुन जावी यांना मान्यवरांच्या हस्ते ‘कलारत्न प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. शिवाजी येडवान यांची संकल्पना असलेल्या ‘नापास’ या लघुपटाचे निर्माते सखाराम जाधव, दिग्दर्शकसचिन बेलेकर, अभिनेत्री कल्पना यमगर- मुंबई व इतर मुख्य कलाकारांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. विठ्ठल काटकर यांनी आभार मानले. यावेळी शंकर पुजारी, बाळासो पुजारी, शानाबाई मोरे, दिगंबर मोरे आदी प्रमुख मान्यवरांसह साहित्य रसिक श्रोते व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta