Monday , September 21 2026
Breaking News

पुन्हा एलपीजी सिलिंडर दरवाढ; केंद्राच्या महागाई धोरणावर लक्ष्मी हेब्बाळकर यांचा हल्लाबोल

Spread the love

 

बेळगाव : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा २९ रुपयांची वाढ केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंबे आणि गृहिणींवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याची टीका त्यांनी केली.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया देताना हेब्बाळकर म्हणाल्या की, गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून मार्च महिन्यात सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. नव्या २९ रुपयांच्या वाढीसह तीन महिन्यांत एकूण ८९ रुपयांची वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना केंद्रातील भाजप सरकारने गॅस दरवाढ करून सर्वसामान्यांच्या अडचणीत भर घातली आहे, असा आरोप त्यांनी केला.

घरगुती अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या स्वयंपाकघरावर या निर्णयाचा थेट परिणाम होणार असल्याचे सांगत त्यांनी गृहिणींना घरखर्च सांभाळणे अधिक कठीण होणार असल्याचे नमूद केले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिक आधीच आर्थिक तणावाखाली असून काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थ, चहा आणि कॉफीचे दर वाढले आहेत. आता घरगुती गॅस सिलिंडर महाग केल्याने सामान्य नागरिकांचे जगणे आणखी कठीण होईल, असे त्यांनी म्हटले.

केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना हेब्बाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. २०१४ मध्ये स्वस्त दरांचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या सरकारने आज महागाईवर नियंत्रण ठेवण्याऐवजी सर्वसामान्यांवर आर्थिक ओझे टाकणारे निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

गॅस सिलिंडर दरवाढीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा आणि महागाईने त्रस्त झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांचे आर्थिक संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारने पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *