
बेळगाव : “या देशातील गोरगरीब आणि सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभा करणे, हा सहकार क्षेत्राचा आत्मा आहे. पण सहकार क्षेत्रासमोर स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरची अनेक मोठी आव्हाने उभी आहेत. त्याला सरकारचे धोरण कारणीभूत आहे” असे प्रतिपादन प्राचार्य आनंद मेणसे यांनी बोलताना केले.
अनगोळ रोड स्थित आदर्श मल्टीपर्पज सहकारी सोसायटीच्या कर्मचारी वर्ग आणि संचालक वर्गाला प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने रविवारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास मार्गदर्शक म्हणून प्रा. आनंद मेणसे व झुवारी ऍग्रो केमिकल्सचे निवृत्त उपाध्यक्ष आर वाय पाटील हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आदर्श चेअरमन एस एम जाधव हे होते.
“सहकार क्षेत्र हे प्रामुख्याने आर्थिक क्षेत्र आहे आणि जगातील इतर देश व आपला देश यामध्ये खूप तफावत आहे. आपल्या देशातील आर्थिक क्षेत्राचे तीन प्रमुख भाग आहेत त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व सोसायटी, खाजगी बँका ज्यामध्ये कार्पोरेट बँकांचाही उल्लेख होतो असे सांगून प्राचार्य मेनसे यांनी भारतातील सहकार चळवळीचा आढावा घेतला.
“1599 साली व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने 1757 साली आपली मुळे घट्ट केली, त्यांनी देश समजावून घेतला आणि या देशातील जनतेला आर्थिक गोष्टींची गरज आहे हे लक्षात घेऊन 1770 साली कलकत्त्यात सुरू केलेली पहिली बँक म्हणजे हिंदुस्तान बँक होय” असे ते म्हणाले.
“1860 ते 1890 या तीस वर्षाच्या काळात भारतात पडलेला दुष्काळ आणि त्या दुष्काळात तत्कालीन सावकारानी केलेली सर्वसामान्यांची लूट, या परिस्थितीचा विचार करून ब्रिटिशांनी 1904 साली केलेला सहकारी कायदा या सर्व गोष्टींचा उहापोह मेणसे यांनी केला. “लोकांच्या परिस्थितीचा विचार करून शाहू महाराजांनी 1912 साली पहिली सहकारी सोसायटी कोल्हापुरात सुरू केली ज्यामध्ये एक रुपयापासून पाच रुपये पर्यंतची कर्ज दिली जायची तिचे आज शाहू बँकेमध्ये रूपांतर झाले आहे, असे ते म्हणाले.
“सावकारी संपवायची असेल तर जनता साक्षर झाली पाहिजे असा विचार देश पातळीवर महात्मा गांधीजींनी केला तर बेळगाव भागात गुरुवर्य शामराव देसाई, बहिर्जी शिरोळकर यांनी 291 शाळा काढून तर बाबुराव ठाकूर यांनी 200 शाळा काढून साक्षरतेचे काम केले. हेच काम महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1000 शाळा काढून केले त्यामुळे सहकार व शिक्षणही दोन्ही क्षेत्रे हातात हात घालून पुढे आली.”
“आज या चळवळी समोर अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठे आव्हान आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी कर्जदार, ठेवीदार यांना शहाणे करण्याची गरज आहे. यासाठी कर्मचारी वर्गाने सहकार क्षेत्र समजावून घेऊन काम करावे ” असे आवाहनही त्यांनी केले.
दुसऱ्या टप्प्यात झुवारी ऍग्रो केमिकल्सचे निवृत्त उपाध्यक्ष आर वाय पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रेरणा ही एका ज्योत सारखी असते, जोपर्यंत त्यामध्ये इंधन घातले जाते तोपर्यंत ती चालू राहते. पैसा, मान्यता, जीवनशैली या सर्व प्रेरणादायी गोष्टी असून मानवी जीवनाचे तीन प्रकार आहेत त्यामध्ये आनंदमयी, चांगले व अर्थपूर्ण जीवन अशा गोष्टींचा समावेश होतो यापैकी अर्थपूर्ण जीवन हे फार महत्त्वाचे असते.” असे सांगून ते म्हणाले की, बाह्य प्रेरणेपेक्षा स्वयं प्रेरणा जी आपल्याला आतून येते ती फार महत्त्वाची असते. आपण जे काम करतो त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, समाधान वाटले पाहिजे, माझी जबाबदारी काय आहे? मी काम का करतो? हे समजून जर काम केले तर त्या कामांमध्ये चांगले यश मिळते”, असेही ते म्हणाले.
आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या संस्थेचे ध्येय काय आहे उद्दिष्टे काय आहेत हे लक्षात घेऊन काम करण्याची गरज आहे असा सल्लाही त्यांनी दिला. “यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे त्यासाठी नियोजन करून जबाबदारी स्वीकारून काम केले पाहिजे. आपला ग्राहक हा आपल्या व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे त्या ग्राहकाची सुरक्षितता आणि समाधानता फारच महत्वाची आहे, ग्राहकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण जबाबदार आहोत हेही लक्षात घेतले पाहिजे” असे मार्गदर्शन आर वाय पाटील यांनी अनेक उदाहरणे देऊन केले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक एस एम जाधव यांनी केले, पाहुण्यांचा परिचय अनंत लाड यांनी करून दिला, पाहुण्यांचा सन्मान दिगंबर राऊळ व ईश्वर मेलगे यांनी केला. उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रशिक्षणामुळे आपल्याला नवी ऊर्जा मिळाली असे मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta