Thursday , November 21 2024
Breaking News

बेळगाव – बाची रस्त्यातील खड्ड्यातून प्रतिकात्मक वृक्षारोपण करून प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा निषेध

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ते बाचीला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यातील खड्ड्यातून प्रतिकात्मक वृक्षारोपण करून प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला.

आंदोलनाच्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवानेते आर. एम. चौगुले म्हणाले की, बाची, चिरमुरी, उचगाव क्रॉस, सुळगा आणि त्यानंतर हिंडलगा गणपती दरम्यानच्या अत्यंत खराब झालेल्या बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये आज आम्ही वृक्षारोपण करून आमचा निषेध नोंदवला आहे. कारण या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या महिन्याभरापासून आमच्या भागातील बरेच लोकप्रतिनिधी, ग्रा.पं. सदस्यांनी विविध मार्गाने आंदोलन करून पाहिली, मात्र प्रशासनाकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे डोळेझाक केली जात आहे. याकरिता प्रशासनाला जागे करण्यासाठी आज आम्ही रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचे हे आंदोलन केले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात या रस्त्यावर असंख्य अपघात झाले असून त्यामध्ये बऱ्याच जणांना गंभीर इजा झाल्या आहेत अशी माहिती देऊन प्रशासनाने जनतेच्या सहनशक्तीचा अंत न पाहता सदर रस्त्याची युद्ध पातळीवर दुरुस्ती करून तो सुरक्षित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा समिती नेते आर. एम. चौगुले यांनी दिला.

बेळगाव ते बाचीला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचून दररोज अपघात होत आहेत. हिंडलगा, सुलगा, कल्लेहोळ, उचगाव, तुरमुरी, बाची, कुद्रेमनी या रस्त्याच्या दुरवस्थेचा आज येथील नागरिकांनी नारळ, केळीचे रोप लावून निषेध केला. बेळगाव-बाची लिंक रोडची दुरवस्था झाली आहे. बाची आणि सावंतवाडीतील प्रवासी याच रस्त्याचा वापर करतात. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेची वाहनेही या मार्गाने दररोज ये-जा करतात. मात्र या रस्त्याचा विकास कोणीच करणार नाही. गेल्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असता त्यांनी येऊन तपासणी केली. मात्र, आजपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. दुरुस्तीचे काम लवकर न झाल्यास रास्ता रोको करून आंदोलन करू, असा इशारा हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य डी. बी. पाटील यांनी दिला.

हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर यांनी सांगितले की, या रस्त्याची गेल्या ६ महिन्यांत खूपच वाईट अवस्था झाली आहे. खडबडीत रस्ते अपघातांना निमंत्रण देतात. सरकारकडून एवढ्या पातळीवर जमा होणारा पैसा नेमका कुठे खर्च होणार, हा जनतेचा प्रश्न आहे. दिवाळीपर्यंत रस्त्याची डागडुजी न केल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.

यावेळी सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांचा सहभाग होता.

About Belgaum Varta

Check Also

ब्रेक फेल झाल्याने मुनवळ्ळी-सौंदत्ती येथे अपघात : दोघांचा मृत्यू

Spread the love  सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावाच्या बाहेर क्रूझर वाहनाचे ब्रेक फेल होऊन, …

One comment

  1. sangeeta Ajarekar

    आज जेवढे म्हणुन या, बेळगाव वार्ताचे वाचक आहेत त्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट होती |
    नमस्कार. वेळ निकरीची , होणार्या परिवर्तनाला लागले किड समूळ नष्ट करण्याची.
    वंदेमातरम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *