बेळगाव : बेळगाव शहरात दिवसेंदिवस खून, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विश्वेश्वरय्या नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसतिगृहात एकाच महिन्यात पाच घरफोड्या झाल्या असून, स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.
गेल्या महिनाभरात चोरीच्या पाच घटना उघडकीस आल्या आहेत. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरील घरातून अशा घटना घडल्या तर सामान्य जनतेच्या घरांचे रक्षण कोण करणार.
विश्वेश्वरय्या नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसतिगृहातील घरे फोडून एक लाखांहून अधिक किमतीच्या दागिन्यांसह चोरट्यांनी पलायन केले आहे. बेळगावात रात्रीच्या वेळी गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत शहरातील विविध भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांना नवीन योजना आणावी लागणार आहे. बेळगाव पोलिसांनी रात्रीची गस्त पुन्हा सुरू करून जनहिताच्या दृष्टीने कारवाई करावी, असा ज्येष्ठ नागरिकांचा आग्रह आहे.
सणाच्या काळात दोन-तीन दिवस घरांना कुलूप लावून शहरा बाहेर गेलेल्यांच्या घरांना चोरटे लक्ष्य करत आहेत. त्यांच्या हाती जे मिळेल ते घेऊन पोबारा करत आहेत. एपीएमसी पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांनी रात्री जागरण करून रहिवाशांच्या सुरक्षेसाठी कडक कारवाई करावी, अशी मागणी विश्वेश्वरय्या नगरमधील रहिवाशांनी केली आहे.