बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौध येथे होणारे हिवाळी अधिवेशन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. हिवाळी अधिवेशनात सर्व समित्यांनी आपल्यावर नेमुन दिलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
आज गुरुवारी सुवर्णसौध येथे आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
अधिवेशनासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात याव्यात. दि. 9 पासून दहा दिवस राज्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा बेळगावात तळ ठोकून राहणार आहे. हिवाळी अधिवेशनाबाबतच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांना नेमुन देण्यात आल्या आहेत, सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे.
अधिवेशनासाठी येणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी योग्य वाहतूक व्यवस्था करावी. सुवर्णसौध सभागृहात दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी.
अधिवेशनासाठी येणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचारी यांची योग्य ती राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात यावी.
काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी पूर्ण झाल्यानिमित्त सुवर्णसौध येथे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्णसौध येथील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संगणक आणि इंटरनेट प्रणालीच्या कार्यक्षमतेचे टॉप-डाउन मॉनिटरिंग असावे.
दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांना नियुक्त केलेल्या संपर्क अधिकाऱ्यांनी अधिवेशन काळात सतत संपर्कात राहावे. कोणत्याही कारणास्तव शिष्टाचाराचे उल्लंघन होऊ नये याची विशेष काळजी घेतली जावी असेही, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कडक सूचना दिल्या.