बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी एकदिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चा सत्राच्या सुरुवातीला कर्नाटकाचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याविषयी अभिनंदनाचा ठराव मांडून मराठी भाषेच्या प्राचीनतेविषयी चर्चा करण्यात आली. दुसऱ्या सत्रात आपल्या भारताच्या संविधान स्वीकारण्याला ७५ वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल आपले संविधान या विषयावर श्रीमती माया पाटील, श्रीमती वरदा देसाई, श्रीमती स्नेहल पोटे, श्रीमती नीला आपटे यांनी आपले विचार मांडले. आपले संविधान व सद्य परिस्थिती, स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय व सामाजिक चळवळ आणि भारतीय संविधान, समाजवाद यापेक्षा वेगळा काय असू शकतो? धर्मनिरपेक्षता आणि संविधान अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. शेवटच्या सत्रात प्रतापसिंह चव्हाण यांनी बदलती शिक्षण पध्दती व शिक्षकांची मानसिकता याविषयी आपले विचार मांडले. यावेळी बेळगाव शहरातील मराठी विषय शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री. जयंत व्ही. नार्वेकर, सेक्रेटरी श्री. सुभाष ओऊळकर, श्रीमती निलू आपटे, श्रीमती गौरी चौगुले, गजानन सावंत, नारायण उडकेकर, हर्षदा सुंठणकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रसाद सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहल बेळगावकर यांनी मांडले.