बेळगाव : सहकारातून सर्वसामान्य माणसांचे जीवन उंचावता येते. त्यासाठी या क्षेत्रात काम करत असताना विश्वास आणि पारदर्शकता हवी. हा संघ शिक्षकांचा असून येथे विश्वास आणि पारदर्शकपणा हा मुळापासूनच असल्याने संघाची भरभराट नक्की होईल, असे खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले. ते येळ्ळूर येथे श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ नोकर पत्तीन सहकार संघ येळ्ळूरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक वाय. एन. मजुकर होते. शिक्षकांच्या अडीअडचणी दूर होवून त्यांची वाटचाल सुरळीत सुरू व्हावी. त्याचबरोबर संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील समस्याही दूर व्हाव्यात, याच उद्देशाने या संघाची स्थापना झाली आहे. इतर कार्यक्षेत्रातील सोसायट्यांप्रमाणे आपली ही हक्काची संस्था असावी हे स्वप्न आज साकार झाले. कर्मचाऱ्यांनी सचोटीने आणि विश्वासाने काम करून या संघाची भरभराट करावी, असे संघाचे संस्थापक वाय. एन. मजुकर यांनी सांगितले.
युनियन बँकेचे मॅनेजर अभिजित सायमोटे यांनी सहकार चालवताना येणाऱ्या अडचणी सांगत संघाच्या व सभासदांच्या ध्येयंपूर्तीसाठी त्यातून मार्ग काढावा लागतो, असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व श्री चांगळेश्वरी देवी, सरस्वती आणि छ. शिवाजी महाराजांच्या फोटो पूजनाने झाली. प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष एस. एम. यळ्ळूरकर, पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष नरेंद्र मजुकर यांनी केले. कार्यक्रमात संचालिका कांचन मजुकर, संचालक के. एल. हुंदरे, चंद्रकांत पाटील, खानापूर अर्बन बँकेचे चेअरमन अमृत शेलार, येळ्ळूर ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील, नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील, धनंजय पाटील, शिक्षण संस्थेच्या शाखांचे सर्व मुख्याध्यापक, सचिव प्रसाद मजुकर यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जे. एम. पाटील यांनी केले. एम. पी. गिरी यांनी आभार मानले.