बेळगाव : कर्णबधिरांच्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य कर्णबधिर संघटनेच्या नेतृत्वाखाली सुवर्णसौधसमोर शेकडो कर्णबधिरांनी आंदोलन केले असून, सरकारकडून न्याय मागण्यात आला आहे.
कर्णबधिरांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, या मागणीसाठी आज सुवर्णसौधसमोर मोठ्या प्रमाणात कर्णबधिरांनी आंदोलन केले. कर्नाटक राज्य कर्णबधिर संघटनेच्या वतीने आयोजित या आंदोलनात शेकडो आंदोलकांनी भाग घेतला. कर्नाटक राज्य कर्णबधिर संघटनेचे अध्यक्ष शंकर यांनी सांगितले की, कर्णबधिरांना रोजगारात अद्याप योग्य त्या प्रमाणात आरक्षण लागू केलेले नाही. तसेच, कर्णबधिर मुलगा व मुलगी विवाह करत असल्यास सरकारकडून जाहीर करण्यात आलेले प्रोत्साहनधनही अद्याप दिले जात नाही. सरकारने ही योजना तातडीने अंमलात आणावी. प्रत्येक जिल्ह्यात संकेतशाळा सुरू करावी, कर्णबधिरांसाठी मासिक मानधन १२०० रुपयांवरून ५००० पर्यंत वाढवावे, तसेच स्वावलंबनासाठी कर्णबधिरांना कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी.
महिला हक्कांसाठी लढणाऱ्या एका कार्यकर्त्या म्हणाल्या की, कर्णबधिर दांपत्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या मुलांना विशेष सुविधा मिळाव्यात. अनेक वेळा सरकारकडे निवेदन दिले, परंतु कोणत्याही सरकारने आमच्या मागण्या गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. न्याय मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. कर्णबधिरांच्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने विशेष पावले उचलावी आणि या समुदायासाठी भेदभाव न करता सुविधा लागू कराव्यात.या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने कर्णबधिर सहभागी झाले होते. त्यांनी शांततेत आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्धार व्यक्त केला. कर्णबधिरांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta