बेळगाव : मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा झुंझावात सर्वत्र चालू आहे. बेळगावसह उपनगरातून सभासदांचा भरघोस पाठिंबा सत्ताधारी पॅनलला मिळत आहे. आज गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी शहापूर येथील उदय सोसायटीमध्ये सर्व सभासद मतदारांना एकत्रित करून आदिनाथ लाटूकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला कॅपिटल वनचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले की, मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेची प्रगती कौतुकास्पद आहे. मराठा समाजाचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी जागरूक मतदार म्हणून आपण सर्वांनी सत्ताधारी पॅनलच्या पाठीशी उभे राहून त्यांना शंभर टक्के मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे. आपण शहापूर भागातून सर्व सभासदांकडून मतदान करून घेऊन सत्ताधारी पॅनलला भरघोस मतांनी विजयी करू असे आश्वासन यावेळी दिले.
सर्व उमेदवारांचे गुलाब पुष्प देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ संचालक बाळासाहेब काकतकर यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेऊन शहापूरचे बँकेशी असलेले नाते सांगितले.
विद्यमान चेअरमन दिगंबर पवार म्हणाले की, कै. गुरुवर्य शामराव देसाई, कै. अर्जुनराव घोरपडे, कै. शिवाजीराव काकतकर, कै. सदाशिव हंगिरगेकर यांचे पुण्यस्मरण करून रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी मतदान करण्यास यावे व आपल्या पॅनलला भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.
माजी महापौर रेणू सुहास किल्लेकर यांनी सामान्य गट, महिला गट, मागासवर्गीय, एससीएसटी यांच्या मतपत्रिकेचे रंग याविषयी सभासदांना माहिती दिली व सत्ताधारी पॅनलला निवडून द्यावे अशी विनंती यावेळी केली. सभेचे अध्यक्ष श्री. आदिनाथ लाटूकर म्हणाले की, मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकांच्या पाठीशी शहापूर विभाग नेहमीच होता आणि यापुढे देखील राहणार. सर्व सत्ताधारी पॅनल भरघोस मताने निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शहापूर भागातील प्रतिष्ठित नागरिक रामकुमार जोशी, शिवाजीराव बाचीकर, कलाप्पा नाकाडी, विनोद लाटुकर, कल्लाप्पा हंडे, सदाशिव तांजी, सुरेश सैनुचे, जगन्नाथ मेलगे, महादेव सुतार, रंजना चव्हाण, तेजस्विनी मुतगेकर, विक्रम शिंदे आदी सभासद उपस्थित होते. त्यानंतर शास्त्रीनगर, वडगाव,येळ्ळूर आदी भागात सत्ताधारी पॅनलने प्रचार केला. सत्ताधारी पॅनलला सर्वत्र भरघोस प्रतिसाद मिळत आहे.