बेळगाव : संपूर्ण बेळगाव शहराचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या पॅनलने बाजी मारली असून केवळ सामान्य गटातील एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले. बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील आणि विद्यमान चेअरमन दिगंबर पवार यांच्या गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखले आहे.
रविवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी बँकेसमोर गर्दी केली होती. मराठा को-ऑपरेटिव्ह सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक चुरशीने पार पडत सत्ताधारी गटाने विजय संपादित केला आहे. आज सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांचे समर्थक बसवान गल्ली येथील मराठा बँकेजवळ हजर होते. मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची सोय केली होती. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे समर्थक आपापल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसून येत होते. मतदान केंद्राच्या परिसरात विविध संघटनांचे पदाधिकारी नेते उपस्थित होते. त्यामुळे त्या भागाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले होते. मतपत्रिकेवर मतदाराला 14 शिक्के मारावे लागत असल्यामुळे काही मतदार गोंधळून गेले होते. किरकोळ वादावादी वगळता मतदान अत्यंत शांततेत आणि चुरशीने पार पडले.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास निवडणूक अधिकाऱ्यांनी पहिला निकाल जाहीर केला यामध्ये अनुसूचित जाती गटातून अशोक कांबळे यांना 841 मते मिळवून विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर माजी महापौर व विद्यमान संचालिका रेणू किल्लेकर यांना सर्वाधिक 1063 मते मिळाली तर दिपाली बुलंद दळवी यांना 868 मते मिळाली. इतर मागास ब गटातून विश्वजीत हसबे 791 मध्ये घेत विजय संपादित केला अनुसूचित जमाती गटातून लक्ष्मण नाईक यांनी 921 मध्ये घेत विजय मिळविला.
सामान्य गटातील मतमोजणी चुरशीची झाल्याचे दिसून आले मतमोजणीसाठी आठ टेबल होते. सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार सुरुवातीपासूनच आघाडीवर होते मात्र अपक्ष उमेदवार विद्यमान संचालक लक्ष्मण होनगेकर यांची लढत चुरशीची ठरली. लक्ष्मण होनगेकर यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. लक्ष्मण होनगेकर हे थोड्याफार फरकाने आघाडीवर होते. शेवटपर्यंत त्यांनी आपली आघाडी कायम राखली व सत्ताधारी गटातील विक्रम कदम पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला तर विनायक होनगेकर हे नव्या जागेसाठी निवडून आले. जसजसे निकाल जाहीर होत होते तसेच समर्थकांकडून फटाके उडून विजय उत्सव साजरा करण्यात येत होता. सामान्य जणांसाठी दिगंबर पवार 921 मते विजयी, बाळाराम पाटील 883 मते विजयी, बाळासाहेब काकतकर 868 विजयी, विनोद हंगिरकर 863 विजयी, मोहन चौगुले 783 विजयी, शेखर हंडे 771 विजयी, मोहन बेळगुंदकर 733 विजयी, लक्ष्मण होनगेकर 655 विजयी, विनायक होनगेकर 648 विजयी.