बेळगाव : 1924 च्या महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शताब्दी वर्षाचा कार्यक्रम अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करून महात्मा गांधींच्या आदर्शांचा देशवासीयांना परिचय व्हावा यासाठी कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे, असे पर्यटन विभागाचे मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले.
बेळगाव सुवर्णसौधच्या प्रांगणात महात्मा गांधींच्या प्रतिमेच्या अनावरण सोहळ्याच्या तयारीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये झालेले अधिवेशन हे केवळ पक्षीय अधिवेशन नव्हते तर ते समाजसुधारणेचे हत्यार होते, असे ते म्हणाले.
समाजातील अस्पृश्यता दूर करून आणि बंधुभावाची भावना रुजवून स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले. पाटील यांनी स्पष्ट केले की, महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी साजरी करून इतिहासाच्या पुनरावृत्ती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गांधीजींच्या आदर्शांचा देशातील प्रत्येकाला परिचय व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने शताब्दी वर्षाचा एक भाग म्हणून 41 कार्यक्रम जाहीर केले असून वर्षभर कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुवर्णसौध येथील महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेते, स्वातंत्र्यसैनिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. 26 डिसेंबर रोजी शहरातील वीरसौध येथील गांधीजींचा पुतळा आणि रामतीर्थ नगरातील गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारक भावनाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, माजी सभापती बी. एल. शंकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी उपस्थित होते.