बेळगावात यावर्षीही सार्व. गणेशोत्सव श्रीमुर्ती मंदिरातच
बेळगाव (वार्ता) : यंदा गणेशोत्सव 10 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. दरम्यान बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी उशीरा नियमावली जारी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये, गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडपा ऐवजी नजीकच्या देवस्थानात श्रीमूर्ती प्रतिष्ठापना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर घरगुती श्रीमूर्ती दोन फुटाची तर सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमूर्ती चार फूट असावी अशी सूचना करण्यात आली आहे.
देवस्थानात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती प्रतिष्ठापना करताना प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
प्रशासनाने सुचविलेल्या वेळेतच आगमन आणि विसर्जन करण्यात यावे अशी सूचनाही करण्यात आली आहे.
उत्सव काळात ध्वनिप्रदूषण टाळण्यात यावे, फटाके लावण्यात येऊ नयेत. डॉल्बी लावण्यात येऊ नये.
श्रीमूर्ती आगमन अथवा विसर्जना प्रसंगी गर्दी टाळावी.
देवस्थानात आरतीच्या वेळी केवळ पाच जणांची उपस्थिती राहावी.
श्रीमूर्ती दर्शनासाठी प्रत्येक मंडळांनी ऑनलाइन, सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्तांना व्यवस्था करावी.
श्रीमूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आलेले देवस्थान प्रत्येक दिवशी सॅनिटायझ करण्यात यावे. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात यावे. सॅनिटायझरचा वापर केला जावा. सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत दक्षता घेतली जावी. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा.
आगमन अथवा विसर्जना प्रसंगी मिरवणूक काढण्यात येऊ नये.उत्सव काळात कोरोनाचे संक्रमण वाढू नये, याची पुरेपूर दक्षता देवस्थान समिती, सार्वजनिक उत्सव मंडळ तसेच पोलिस, मनपा, आरोग्य, तहसील, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी घेणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.