Saturday , January 11 2025
Breaking News

सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याबाबत समितीच्या शिष्ठमंडळाने घेतली खा. धैर्यशील माने यांची भेट

Spread the love

 

 

बेळगाव : महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात यावे यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली.

गेली सहा दशके महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाचा लढा म.ए. समितीच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने सुरू आहे. तसेच सीमाप्रश्नाचा दाखल केलेला खटला २००४ पासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मागील काहीं वर्षात कर्नाटक शासनाचा मुजोरपणा वाढला असून सीमाभागतील मराठी भाषा संपविण्यासाठी ते सर्व बाजूंनी मराठी माणसाची कोंडी करत आहे. त्यात कन्नड भाषा येत नसल्यामुळे सीमाभागातील मराठी तरूणांना कर्नाटकातील नोकऱ्यामधून जाणीवपूर्वक डावलले जाते. त्यामुळे सीमावर्ती भागातील मराठी तरूण नोकरीसाठी आणि रोजगारासाठी पुर्णपणे नजिकच्या महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतींवर अवलंबून आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती, सीमाभागातील मराठी माणसाची होणारी गळचेपी वेळोवेळी महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देत असते.

सीमाभागातील बेरोजगारीने पिचलेल्या बेरोजगार तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांनी सीमाभागात महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार महामेळावा घेण्यात यावा, यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्यामार्फत तत्कालीन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला प्रतिसाद देऊन महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीचे औचित्य साधून, १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन केले होते. सदर रोजगार मेळाव्याला सीमाभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून, पाच हजारावर बेरोजगार तरूणांनी हजेरी लावली होती. तर मुलाखती अंती तब्बल सतराशे तरूणांना विविध महाराष्ट्रातील आस्थापनांकडून ताबडतोब नोकरीची नेमणूक पत्रे देण्यात आली होती. मेळावा यशस्वी झाल्यामुळे सीमाभागातील बेरोजगार तरूणांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सदर मेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आवर्जून हजेरी लावली होती. मेळाव्याला संबोधीत करतांना, युवकांचा प्रतिसाद पाहून, त्यांनी सीमाभागासाठी असा रोजगार मेळावा महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी शिवजयंती दिवशी आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते.

गेल्यावर्षी काहीं तांत्रिक कारणामुळे सीमाभागातील या रोजगार महामेळाव्याचे आयोजन होऊ शकले नाही. त्यामुळे सीमाभागातील बेरोजगार युवकांकडून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, निपाणी यांचेकडे रोजगार महामेळाव्याबाबत विचारणा होत असून तशी मागणी जोर धरत आहे. यावर्षी महाराष्ट्रामध्ये परत महायुतीचे सरकार सत्तेवरती येऊन उद्योग मंत्रीपद उदय सामंत यांचेकडेच आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, निपाणीच्या वतीने अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांनी युवकांच्या मागणीची दखल घेऊन सीमाभागासाठी रोजगार महामेळाव्याचे आयोजन येत्या शिवजयंती दिवशी करण्याबद्दल पाठपुरावा सुरू केला आहे. याचा फायदा सीमाभागातील शेकडो बेरोजगार युवकांना होणार असलेने त्याची चर्चा युवक वर्गातून होतांना दिसत आहे. यावेळी खा. धैर्यशील माने यांनी रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित सीमा वादाच्या खटल्याला गती देण्यासाठी लवकरात लवकर बैठक आयोजित करू असे सांगितले. तसेच देशाचे गृहमंत्री मा. अमित शहा यांची लवकरच सीमा प्रश्नासाठी भेट घेण्याचे आश्वासन त्यांनी समितीच्या शिष्टमंडलाला दिले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी भाग अध्यक्ष श्री जयराम मिरजकर, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग अध्यक्ष श्री. शुभम शेळके, कार्याध्यक्ष श्री. धनंजय पाटील, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनील किरळे, सचिन दळवी, रमेश कुंभार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चांद शिरदवाड पंचकल्याण महामहोत्सवात सुविधांना प्राधान्य

Spread the love  खासदार प्रियंका जारकीहोळी ; बोरगाव भेटी दरम्यान दिली ग्वाही निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *