बेळगाव : बेंगळुरातील ‘त्या‘ शिवपुतळ्याला दुग्धाभिषेक घातल्याबद्दल सन्मान माझ्या राजांच्या विटंबना झालेल्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालणे, तेथे शिवगर्जना करणं ही एक शिवभक्त म्हणून भावना होती. महाराजांच्या गनिमीकाव्याचा वापर करून बंगळुरूत शिवजयंतीदिनी त्याच पुतळ्याला दुग्धभिषेक केला. बेळगावातील लोकांना पूर्वकल्पना न देता गनिमीकाव्याने सकारात्मक संदेश देत आम्ही बंगळुरूत शिवपुतळ्याचा अभिषेक केला आहे, त्याच ठिकाणी शिवगर्जना केली असे अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
बेळगाव पुणे-बंगळुरू हायवेवरील कोंडुस्कर भवन येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. शनिवारी अमोल कोल्हे आणि सहकाऱ्यांनी बंगळुरू येथे अवमान झालेल्या शिवपुतळ्याला अभिषेक घातल्यावर पुणे येथे जाताना त्यांनी बेळगावला धावती भेट दिली. कोंडुस्कर भवन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीरामसेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, राष्ट्रवादीचे मेहबूब शेख, आदिल फरास आदी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती साजरी होत असताना बंगळुरूत केलेली शिवगर्जना उत्साह, ऊर्जा देणारी ठरली आहे. ज्या पुतळ्याला अभिषेक घातला त्याच पुतळ्याला 1994 मध्ये शरद पवारसाहेबांनी 25 लाखांची देणगी दिली होती याचाही अभिमान असल्याचं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलं. दुर्गामाता दौड शंभूराजे नाटक, मराठी टायगर्स सिनेमानंतर आज मी बेळगावात आलोय. सीमाभागातील मराठी माणसाच्या गळचेपीविषयी आवाज उठवण्यासाठी नेहमी बेळगाववासीयांच्या पाठीशी राहीन असे आश्वासन त्यांनी दिले. घटनात्मक पद्धतीनं आपल्याला पुढे जायला लागेल, असेही डॉ. कोल्हे म्हणाले. यावेळी बोलताना रमाकांत कोंडुस्कर यांनी बंगळुरुतील ‘त्या’ अवमान झालेल्या शिवपुतळ्याला दुग्धभिषेक करून बेळगावातील शिवप्रेमींची इच्छा पूर्ण केली असल्याचे सांगत आम्ही 47 दिवस कारागृहवास सोसलेल्या युवकांची मागणी त्यांनी पूर्ण केली आहे, असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शेकडो शिवप्रेमी, म. ए. समिती आणि श्रीरामसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …