उपविजेता चिरमुरी संघ
बेळगाव : साधना क्रीडा केंद्र आणि नवज्योत खो- खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने खो-खो स्पर्धेचे आयोजन सुळगा (हि.) येथे रविवार दि. 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. एक गाव एक संघ मर्यादित ही स्पर्धा भरविण्यात आली होती. सदर स्पर्धेला बेळगाव परिसरातील एकूण दहा संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामना कडोली खो-खो संघ आणि चिरमुरी खो-खो संघ यांच्यामध्ये रंगला होता. या स्पर्धेत कडोलीचा संघ विजयी झाला तर चिरमुरीचा संघ उपविजेता ठरला.
प्रथम पारितोषिक कै. विमला चंद्रकांत कोरे यांच्या स्मरणार्थ 10000 रु. कोरे कुटुंबियांकडून देण्यात आले होते तर बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्यातर्फे स्पर्धकाना चषक देण्यात आले. तर उपविजेत्या संघाला मार्कंडेय को. ऑप. सोसायटी मन्नूरतर्फे 7000 रु. रोख रक्कम देण्यात आली.
अखिल भारतीय खो-खो फेडरेशनचे माजी सचिव श्रीकांत मोरे यांनी या स्पर्धेत आपली उपस्थिती दर्शविली.
यावेळी साधना क्रीडा केंद्राचे प्रकाश नंदिहळी, प्रकाश देसाई, आनंद मेणसे, पी. ओ. धामणेकर, संजय बेळगावकर, अजित भोसले, विवेक पाटील, के. शिवानंद, सतीश बाचीकर, उमेश पाटील, परशराम येळ्ळूरकर, मुकुंद जाधव, राजू मुचंडी, अशोक हलगेकर, शांतप्पा कडोलकर, वैजनाथ चौगुले, परशराम कांबळे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत पंच म्हणून नितीन नाईक आणि महेश सिद्धाणाचे यांनी काम पाहिले.