Wednesday , December 17 2025
Breaking News

उद्या इस्कॉनची हरेकृष्ण रथयात्रा : सर्व शहर कृष्णमय बनणार

Spread the love

 

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) च्या वतीने 27 वी हरेकृष्ण रथ यात्रा शनिवार दुपारी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू होणार आहे. या रथयात्रेत देश विदेशातून आलेले हजारो भक्तगण सहभागी होत आहेत. बेळगाव इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज, मूळचे मॉरिशसचे असलेले चंद्रमौली स्वामी महाराज व देश विदेशातून आलेल्या इतर जेष्ठ भक्तांच्या हस्ते आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल.
रथयात्रा ध. संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडे बाजार, शनिवार खुट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली मार्गे रेल्वे ओव्हर ब्रीजवरुन कपिलेश्वर रोड, एसपीएम रोड, खडे बाजार, शहापूर, नाथ पै सर्कल, बीएमके आयुर्वेदिक कॉलेज रोड, गोवावेस मार्गे इस्कॉनच्या मागे असलेल्या मैदानावर संध्याकाळी ६.३० वा. पोहोचेल.
तिथे किर्तन, ज्येष्ठ सन्याशांची प्रवचने आणि सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या रथयात्रेमध्ये सजवलेल्या बैलजोड्या आणि बैलगाड्या भाग घेणार असून भगवद्गीतेवर आधारित विविध प्रसंग दर्शवणारे चित्ररथ सहभागी झालेले असतील. रथयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी होणार असून भाविकांना पाणी, सरबत आणि फळांचे वाटप केले जाणार आहे. बेळगाव जिल्हा महानगरपालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय रथयात्रा मार्गावर व मंदिराजवळ करण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून रथयात्रा व्यवस्थित पार पडण्यासाठी संपूर्ण सहकार्य देण्यात आले आहे
रथयात्रेच्या संपूर्ण मार्गावर अतिशय सुंदर अशा रांगोळ्या घातल्या जाणार असून त्यासाठी एक संपूर्ण युनिट कार्यरत आहे.
श्री राधा गोकुलानंद मंदिराच्या पाठीमागील बाजूस भव्य असे मंडप उभारण्यात आले असून तेथे भगवत गीता प्रदर्शन, स्लाईड शो, मेडिटेशन पार्क, गो सेवा स्टॉल, अध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन, युवकांना मार्गदर्शन करणारे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी दोन्ही दिवस भजन, कीर्तन याचबरोबर ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने, नाट्यलिला आदी कार्यक्रम होणार आहेत.
मंदिरास भेट देणाऱ्या सर्वांसाठी दोन्ही दिवस रात्री महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत आहे.
रविवारचे कार्यक्रम
रविवार दि.2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०४.३० ते ०५.३० पर्यंत नरसिंह यज्ञ ज्यामध्ये अनेक भक्त सहभागी होतात. ०६.३० ते १० वा. पर्यंत भजन, किर्तन, प्रवचन, नाट्यलिला आणि सर्वांसाठी महाप्रसाद.
वरील सर्व कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.
मंदिर प्रशासन आणि रथयात्रा समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण भट्टड यांनी विनंती केली आहे की, मंदिराकडे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी आपली वाहने (दुचाकी व चार चाकी) मंदिरा बाहेरील मुख्य मार्गावरच पार्क करून आत यावे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव कृषी खात्याच्या अधिकाऱ्यावर लोकायुक्त पोलिसांचे छापे

Spread the love  बेळगाव : कृषी खात्याचे बेळगाव जिल्हा दक्षता दलाचे सहसंचालक राजशेखर इराप्पा बिजापूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *