
बेळगाव : महायुती सरकार बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी ठाम उभे आहे आपल्या मागण्यांसाठी समितीला मुंबईत धरणे आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.
रविवारी दिल्ली मुक्कामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली त्यावेळी अजितदादा पवारांनी माध्यमांशी बोलताना असे आश्वासन दिले आहे.
कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती झाली नाही ती नियुक्ती व्हावी. 2022 पासून उच्च अधिकार समितीची बैठक झाली नाही. हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे म्हणणे योग्य आहे या संदर्भात मी महाराष्ट्राचे वकील शिवाजीराव जाधव यांच्याशी बोललो आहे. समितीच्या सर्व मागण्या पूर्ण होतील जेणेकरून मुंबईत समितीला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलं.
मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली महाराष्ट्र शासनाने सीमाप्रश्नावर उच्च अधिकार समितीची बैठक घ्यावी सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करावी. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीला ज्येष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे यांना सुनावणीसाठी थांबण्यासाठी प्रयत्न करावेत अशा मागण्या मध्यवर्ती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या.
यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव, बाबू कोले, सुनील आनंदाचे, सुहास हुद्दार, उमेश पाटील, माजी जि. पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, माजी नगरसेवक अनिल पाटील, मारुती मरगानाचे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta