बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांच्या विरोधात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महानगरपालिका कर्मचारी यल्लेश बच्चलपुरी यांनी सोमवार दिनांक 24 रोजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांकडून आपल्याला त्रास दिला असल्याची लेखी तक्रार त्यांच्याकडे दाखल केली आहे त्यामुळे नगरसेवक व कर्मचारी बच्चलपुरी यांच्यातील संघर्ष विकोपाला पोहोचल्याचे दिसून येत आहे. सदर तक्रारीत बच्चलपुरी यांनी सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांनी कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला याची सविस्तर माहिती जिल्हा पालकमंत्र्यांना दिली. महानगरपालिका कर्मचारी बच्चलपुरी यांनी यापूर्वीच या दोन्ही नगरसेवकांच्या विरोधात नागरी हक्क अंमलबजावणी विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. सदर विभागाकडून हे प्रकरण पुढील चौकशीसाठी शहापूर पोलिसांकडे पाठवले होते शहापूर पोलिसांनी संबंधित नगरसेवकांची चौकशी सुरू केली त्याच दरम्यान हे प्रकरण मार्केट पोलिसांकडे वर्ग करण्यात आले मात्र मार्केट पोलिसांकडून या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी झालेली दिसत नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात कर्मचारी संघटनेकडे देखील यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेतील पाचव्या वित्त आयोगाच्या बैठकीत एका नगरसेवकाने हा विषय उपस्थित केला होता. कर्मचाऱ्यांकडून आपल्या विरोधात तक्रार दाखल केली जात आहे त्यामुळे आपल्याला काम करण्यास अडचणी येत असल्याचे आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात आले मात्र आयोगाच्या अध्यक्षांनी नगरसेवकांच्या या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे समजते व या संदर्भात आपण न्यायालय किंवा पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देखील अध्यक्षांनी त्यांना दिला. मात्र मार्केट पोलिसांकडून व कर्मचारी संघटनेकडून आपल्या तक्रारी संदर्भात कोणतीच हालचाल होत नसल्याने बच्चलपुरी यांनी थेट पालकमंत्र्यांकडे आपली तक्रार दाखल केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta