बेळगाव (वार्ता) : सांबरा, बेळगाव येथील भारतीय हवाई दलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 3606 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षान्त समारंभ आज शनिवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला.
एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या परेड ग्राऊंडवर झालेल्या सदर दिमाखदार सोहळ्यास बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूलचे ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. डी. मुकुल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी प्रशिक्षणार्थी एअरमन्सनी शानदार संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रमुख पाहुणे एअर कमोडोर मुकुल यांनी परेडची पाहणी केल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान विविध प्रकारात सर्वोत्तम कामगिरी बजावणार्या एअरमन्सना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांनी हवाईदलाच्या क्रियात्मक वातावरणात सर्वांनी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे सांगून व्यवसायिक कौशल्याच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय हवाई दलात उज्वल भविष्य असल्याचे स्पष्ट करून प्रत्येकासाठी आपली बाजू उंचावण्यास अनेक संधी वाट पाहत आहेत, त्यांचा योग्य वेळी घ्यावा असे मुकुल यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी त्यासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. वैयक्तिक स्वच्छतेसह कामाच्या वेळी सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहनही एअर कमोडोर मुकुल यांनी केले.
दीक्षांत सोहळ्याप्रसंगी प्रशिक्षणार्थी एअरमन बालाजी एम. याची बेस्ट इन जनरल सर्व्हिस, सुरेन्द्र कुमार यांची बेस्ट इन अकॅडमी, मनीष चौरसिया याची बेस्ट मार्क्स मन आणि कुलदीप यांची ओव्हर ऑल फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरीट या पुरस्कारासाठी निवड करण्यात येऊन त्यांना प्रमाणपत्रासह आकर्षक करंडक देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर सोहळ्यास निमंत्रितांसह भारतीय हवाई दलाचे अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी एअरमन्सचे नातेवाईक उपस्थित होते. दीक्षांत सोहळ्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले 3606 एअरमन्स भारतीय हवाई दलाच्या विविध विभागात देशसेवा बजावण्यासाठी रवाना झाले आहेत.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …