
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गृह भेटी देण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. अभ्यास कसा करावा? अभ्यासाचे महत्त्व शिक्षकांनी गृह भेटीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच बालक व पालक यांच्या अडचणी समजून घेतल्या. येणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे? याविषयी मार्गदर्शन केले, घरी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्वक वातावरण निर्माण करावे, छोटेसे ग्रंथालय असावे, विद्यार्थ्यांना विविध छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्यावे याबाबतही सांगण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षकांनी त्या- त्या ठिकाणानुसार विद्यार्थ्यांना भेटी दिल्या. थेट शिक्षकच घरी आल्याने विद्यार्थी व पालक आनंदी झाले. शिक्षक -बालक -पालक या त्रिकोणाचा समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरला.
गृहभेट यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta